- भोसरीकरांच्या स्वाभिमानासाठी छाया सोळंके-जगदाळे शिरुर लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ३० एप्रिल २०२४) :- मागील २०१९, च्या निवडणुकीपासून भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे व प्रथम आमदार विलास लांडे हे शिरुर लोकसभेसाठी इच्छुक होते. पण या दोघांनाही पक्ष श्रेष्ठीने डावले असल्यामुळे भोसरीतील ५ लाखावरील भोसरीकर मतदारांचा माझ्या सह स्वाभिमान दुखवला गेला आहे. याचा राग भोसरीतील प्रत्येक मतदारांना आहे. तो राग भोसरीकर मतपेटीच्या व्दारे निश्चित व्यक्त करतील, असे विधान पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार छाया सोळंके- जगदाळे यांनी केले आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात जुन्नर व आंबेगाव विधानसभे पेक्षा भोसरी विधानसभेतील मतदारांची संख्या ही दुप्पट आहे. त्या अनुशंगाने या वेळेस भोसरीतील उमेदावर पक्ष श्रेष्ठीने देणे अपेक्षित होते. तसेच ग्रामिण पेक्षा हडपसर व भोसरी मतदारसंघात अनेक जिवघेण्या समस्या आहेत. या मतदार संघातील ५५ टक्के लोकसंख्या ही फक्त भोसरी व हडपसर या दोन शहरी मतदार संघातच वास्तव्यास आहे. तीन वेळा ग्रामिण भागाला संधी दिली असल्यामुळे या वेळी महेश लांडगे यांना किंवा विलास लांडे यांना पुन्हा संधी देणे क्रमप्राप्त होते. पण तसे न करता पुन्हा ग्रामिण भागलाच संधी दिल्यामुळे शहरा भागाकडील समस्याकडे नेहमीसारखेच दुर्लक्ष होणार आहे यात शंका नाही. या बरोबरच नेहमीच भोसरीतील इच्छुकांनी इच्छा व्यक्त करुनही संधी दिली जात नाही याचाही राग येथील मतदारामध्ये कायम आहे.
तसेच लांडे व लांडगे यांना संधी न देऊन भोसरीकरांच्या स्वाभिमानाला तडा देण्याचे काम दोन्ही राष्ट्रवादी व भाजपाने केले आहे. हे भोसरीकर कदापी विसरणार नाहीत. भोसरीच्या बाहेरील उमेदवाराला भोसरीतल रेड झोन व इतरही बाबतच्या समस्याबाबत कितपत गांभिर्य असते हे देखील भोसरीतील मतदारांनी आजपर्यत अनुभवले आहे. यामुळे या दोन्ही उमेदवारांना भोसरीतील मतदारांनी मते न देऊन आपला स्वाभिमान जागृत ठेवावा असे आवाहान देखील छाया सोळंके-जगदाळे यांनी केले आहे.
आमदार महेश लांडगे यांना पक्ष श्रेष्ठीने हा मतदार संघ आपल्याकडे ठेऊन उमेदवारी दिली असती तर महेश लांडगे निश्चित प्रचंड मताने विजयी होऊन खासदार झाले असते. अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांना रेडझोनचा प्रश्न निकाली काढण्यास आलेले अपयश निश्चितपणे महेश लांडगे यांनी धुवुन काढत यश आले असते. येथील तीन लाख मतदारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नातुन कायमची मुक्तता झाली असती. जरी पक्षातील काही बंधनामुळे लांडगे किंवा लांडे यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठवता येत नसला तरी मतदार आणि मी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समर्थ असल्यामुळे मी लोकसभेच्या रिंगणात उभी आहे. तरी भोसरीतील रेडझोनग्रस्त मतदारांनी मला मते देऊन विजयी करावे.
छाया सोळंके-जगदाळे, पिंपरी चिंचवड परिवर्तन आघाडीच्या उमेदवार…