न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२४) :- लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ९५ लाख रुपये आहे. मतदारसंघामध्ये एकूण ३३ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
आकुर्डीतील प्राधिकरण कार्यालयात उमेदवारी खर्चाबाबत बैठक पार पडली. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना पद्मश्री तळदेकर यांनी उमेदवारी खर्चाबाबत माहिती दिली. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या विविध तपासण्या करण्यासाठी आकुर्डी येथील कार्यालयात पाचव्या मजल्यावर निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे. खर्च तपासणी पथकप्रमुख अश्विनी मुसळे व सहायक खर्च निरीक्षक म्हणून सविता नलावडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
३ मे, ७ मे आणि ११ मे रोजी होणार तपासणी…
दैनंदिन खर्चाचा तपशील सादर करण्यासाठी तपासणी खर्चाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तपासणी तीन टप्प्यांत होणार असून उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे नियंत्रण करण्यात येत आहे. दरम्यान, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ३ मे रोजी, तर दुसरी तपासणी ७ मे रोजी, तर तिसरी तपासणी ११ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे.