- कामगार संपावर जाण्याच्या तयारीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०५ मे २०२४) :- देहूगाव नगरपंचायतमध्ये २७ कामगार हे ठेकेदार पद्धतीत काम करीत आहेत. त्यात पाणीपुरवठा विभागाच्या कामगारांचाही समावेश आहे. ठेकेदाराकडून त्यांचा पगार नियमित आणि वेळेत मिळत नसल्याने कामगार त्रस्त झाले असून त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर हे कामगार संपावर जाणार आहेत.
देहूगर पंचायत ही दरवर्षी ठेकेदार बदलत असते. त्याप्रमाणे नवीन कंत्राटी ठेकेदार नेमला आहे: परंतु त्याना पूर्वीच्या महिन्यांचा पगार या कंत्राटी कामगारांना देण्यात आलेला नाही. शिवाय दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये पीएफ कट केला जातो; परंतु मागील वर्षी पीएफ कट करूनदेखील प्रत्येक कंत्राटी कामगारांच्या नावावर फक्त सहा ते सात हजार रुपयेच जमा असल्याची बाब कामगारांच्या निदर्शनास आली. त्यामुळे हे कंत्राटी कामगार त्रस्त झाले आहेत.
पगार वेळेत आणि दर महिन्याला होत नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यापुढे दर महिन्याला दहा तारखेच्या आत पगार मिळावा, पगाराची पावती, पीएफ आणि ईएसआय भरलेली पावती मिळावी, अशा मागण्या नगरपंचायतीच्या कंत्राटी कामगारांनी मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.
यासंदर्भात मुख्याधिकारी घार्गे म्हणाल्या, येत्या तीन दिवसांत दोन पगार होतील. तशा सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.