- तेरा गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसं जप्त; वेपन डीलरही पोलिसांच्या जाळ्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मे २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने शहरामध्ये बेकायदा अग्नीशस्त्राची तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह इतर तिघांना अटक करुन अग्नीशस्त्रे खरेदी विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे. तसेच ०७ गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे (राऊंण्ड) जप्त केले आहेत.
पोलिसांना (दि. २८/०४/२०२४) मरकळगाव येथे सराईत गुन्हेगार अर्जुन भाऊराव सुर्यवंशी (वय २० वर्षे रा. कोकण धर्मशाळा पदमावती रोड आळंदी) हा गावठी पिस्टल घेवुन येणार असल्याची माहिती मिळाली. दरोडा विरोधी पथकाने त्या ठिकाणी सापळा रचुन सराईत गुन्हेगार अर्जुन सुर्यवंशी याला मरकळ गाव येथे पकडले. त्यावेळी त्याचेकडुन ८२,००० रुपये किंमतीचे ०२ गावठी पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे (राऊंण्ड) हे जप्त करण्यात आले होते. त्याअनुशंगाने आळंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १२८/२०२४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व पुढील तपास दरोडा विरोधी पथकाकडुन सुरु करण्यात आला.
नमुद गुन्हयाचे तपासादरम्यान सदर गुन्हयातील अटक आरोपी अर्जुन सुर्यवशी याने पिंपरी चिंचवड शहरामध्ये अग्नीशस्त्राची तस्करी करणारा (वेपन डिलर) अंकीत भस्के याचेकडुन अग्नीशस्त्रे विकत घेतल्याचे निष्पन्न झाले त्याने भस्के याचेकडुन आणखीन ०२ गावठी पिस्टल व जिवंत काडतुस (राऊंण्ड) विकत घेतले होते व ते सराईत गुन्हेगार तुषार नथुराम बच्चे (वय ३१ वर्षे, रा शिवाजीवाडी शिव क्लासीक सोसायटी समोर, मोशी) याचेकडे ठेवण्यास दिलेले आहे असे निष्पन्न झाले. त्याअनुशंगाने सराईत गुन्हेगार तुषार बच्चे यास भारतमाता चौक, मोशी, पुणे येथुन ८१,००० रुपये किंमतीचे ०२ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस सह ताब्यात घेवुन नमुद गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतर अग्नीशस्त्राची तस्करी करणारा (वेपन डिलर) अंकीत भस्के हा पारनेर पोलीस स्टेशन येथिल अग्नीशस्त्रे बाळगल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्हयामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये दुय्यम कारागृह, पारनेर, अहमदनगर येथे असल्याने त्यास तेथुन ताब्यात घेवुन सदर गुन्हयामध्ये अटक करुन त्याचेकडुन त्याने विक्री करीता आणलेले ८१,००० रुपये किंमतीचे ०२ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस हे जप्त करण्यात आले. अकीत भस्के याने आरोपी नामे कमल रामदास राठोड, २६ वर्षे, रा नानेकरवाडी, ता खेड, जि पुणे यास देखील गावठी पिस्टल व जिवंत काडतुस विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास हनुमान वाडी, आळंदी, पुणे येथुन ताब्यात घेण्यात आले व त्याचेकडुन ४१,००० रुपये किंमतीचे ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे असे एकुण २,८५,००० रुपये किंमतीचे ०७ गावठी पिस्टल व ०५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले आहे. गुन्हयाचा पुढील तपास हे दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी हे करीत आहे.
गुन्हयातील अग्नीशस्त्राची तस्करी करणारा (वेपन डिलर) अंकीत भस्के याचेविरुध्द पिंपरी चिंचवड तसेच अहमदनगर येथे शरीराविरुध्दचे अपराध केल्याचे तसेच अग्नीशस्त्र बाळगणे व तस्करी करणे याबाबतचे गुन्हे नोंद आहे. सराईत गुन्हेगार अर्जुन सुर्यवशी याचेविरुध्द पिंपरी चिंचवड येथे खुनाचा प्रयत्न व मारामरी चे गुन्हे नोंद आहे. तसेच सराईत गुन्हेगार तुषार बच्चे याचेविरुध्द देखील पिंपरी चिंचवड मध्ये बेकायदा जमाव जमवुन दहशत निर्माण करणे व अग्नीशस्त्रे बाळगणेबाबतचे गुन्हे नोंद आहे.
दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभा निवडणुक २०२४ ही सुरु असताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये अग्नीशस्त्र जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात कडक कार्यवाही केली असुन जानेवारी २०२४ ते मे २०२४ पर्यंत दरोडा विरोधी पथकाकडुन एकुण ०५ गुन्हे दाखल करत ५,२९,५०० रुपये किंमतीचे एकुण १३ गावठी पिस्टल व १३ जिवंत काडतुसे (राऊंण्ड) जप्त करुन अग्नीशस्त्र विरोधीतील कार्यवाही मध्ये पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेमध्ये अव्वल कामगिरी केलेली आहे.