न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२४) :- मामाच्या गावाला यात्रेला आलेला रुद्र महेंद्र फापाळे (वय ८) हा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला. ही घटना काळवाडी (ता. जुन्नर) येथील काळेस्थळ वस्ती शिवारात बुधवारी (दि .८) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
मुळचे अकोले अहमदनगरच्या बदगी बेलापूर येथील फापाळे हे यात्रेनिमित्त काळवाडी येथे त्यांचे नातेवाईक रोहिदास गेनभाऊ काकडे यांच्याकडे आले होते. रुद्रची आई काल पुन्हा आपल्या गावी गेली असता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. घराच्या बाजूला असणाऱ्या गोठ्याजवळ रुद्र जात असताना अचानक बिबट्याने येऊन त्याच्यावर हल्ला केला व त्याला उचलून घेऊन गेला.
बाजुच्या उसाच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती वन विभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेमुळे ग्रामस्थांचा उद्रेक वाढला आहे.