न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२४) :-शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार खर्चामध्ये आढळून आलेली तफावत वाढली आहे.
त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे या दोन्ही उमेदवारांना तातडीने खर्चाचे स्पष्टीकरण देण्याबाबत दुसरी नोटीस बजाविली आहे.
दोघांच्या प्रचार खर्चामध्ये आढळून आलेली तफावत वाढली आहे. उमेदवारांच्या दैनंदीन प्रचारखर्चावर निवडणूक खर्च विभागाचे बारीक लक्ष असून दैनंदीन ताळेबंद ठेवला जात आहे. उमेदवारांच्या प्रचार खर्चाची पहिली तपासणी ३ मे रोजी पार पडली. त्यामध्ये आढळराव यांच्या खर्चात २४ लाख २७ हजार ९२१ रुपये, तर कोल्हे यांच्या खर्चात १३ लाख ५४ हजार तीन रुपये इतक्या खर्चाची तफावत आली. उमेदवारांनी सादर केलेला आणि प्रशासनाने नोंदविलेला हिशोब जुळत नसल्याचे समोर आले. त्यानुसार दोन्ही उमेदवारांना ५ मेपर्यंत खर्च सादर करण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर ७ मे रोजी दुसऱ्या टप्प्यातील खर्चाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आढळराव यांच्या खर्चात ३० लाख ४६ हजार ७८६ रुपये, तर कोल्हे यांच्या खर्चात ११ लाख ७७ हजार ४५८ रुपयांची तफावत येत आहे. त्यामुळे याबाबत खुलासा करावा, अशी दुसरी नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी बजावली आहे.