न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२४) :- पुणे, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे नाव सापडले नाही किंवा वगळण्यात आले असल्यास तातडीने नवमतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ भरावा. त्यानंतर विधानसभेसाठी मतदानाची संधी उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
याबाबत दिवसे म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या काही वेबसाइटवरून मतदारांची माहिती मिळण्यास तांत्रिक अडथळे येत आहेत. त्यामुळे शहरातील मतदारयादीत नाव शोधण्यासाठी पुणे महापालिकेच्या १५, तर पिंपरी चिंचवड महापालिकेमधील ८, अशा २३ प्रभाग कार्यालयांमध्ये हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनद्वारे अनेकांना मतदार यादीतून नाव शोधून देण्यास मदत करण्यात येत आहे.
मतदार नोंदणीनंतर यादी तयार करताना तांत्रिक प्रक्रियेतील चुकांमुळे, तसेच एकसारख्या छायाचित्रांमुळे नावे वगळली असावीत, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही मतदारांची नावे दोन जिल्ह्यांमध्ये असल्याचे समोर आले आहे. नवमतदार नोंदणीचा अर्ज क्रमांक ६ भरावा, असे आवाहन केले आहे.
” मतदारांची नावे न आढळल्यास त्यांनी तातडीने नवमतदाराचा अर्ज क्र. ६ भरून द्यावा. त्यानुसार निवडणुकीनंतर तातडीने नोंद करण्यात येईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची संधी उपलब्ध होईल.” – डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी…