- मतदार जनजागृतीसाठी भोसरीतील वकिलांचा अनोखा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२४) :- लोकशाहीचा आत्मा असणारा मतदार हा खरा घटक आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व मतदार जागृत व्हावा यासाठी भोसरीतील प्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड. बाळासाहेब थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरीतील नामवंत वकिलांनी एकत्र येऊन आपल्या फि मध्ये भरघोस सवलत देण्याचे घोषित केले आहे.
मतदारांनी आपण मतदान केल्याची निशाणी दाखवत या सवलतीचा फायदा घ्यावा. (दि. १३ ते २० मे) या कालावधीमध्ये ही सवलत उपलब्ध होणार आहे, अशी माहिती ॲड. बाळासाहेब थोपटे यांनी दिली.
ॲड. संदेश थोपटे, ॲड. किशोरी देशमुख, ॲड. गोविंद वाघ, ॲड. अर्चना जाधव, ॲड. कृष्णा गोटमवाड, ॲड. अनिता गवई, ॲड. आशा मुंंडे, ॲड. प्राजक्ता थोपटे, ॲड. अश्विनी गायकवाड, ॲड. नुपूर बोरा या वकिलांच्या सहकार्याने ही सवलतीची योजना राबविण्यात येणार आहे.
मतदार जागृतीसाठी शासन, महानगरपालिका स्तरावर अनेक उपक्रम राबवले जात आहेत. भोसरी,, मोशी, चिखली व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी या सेवेचा फायदा घ्यावा व मतदार प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.