- मतमोजणीआधीच वाघेरेंचे विजयी बॅनर; आचारसंहितेचा भंग?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२४) :- लोकसभा निवडणुकांच्या निकालाला २० दिवस बाकी आहेत. मात्र, मावळ मतदारसंघातील लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे- पाटील यांच्या विजयाचे बॅनर समर्थकांनी लावले आहेत. पुण्यात धंगेकरांच्या बॅनरनंतर आता मावळात वाघेरे यांचे बॅनर लागल्याने निवडणूक विभागाच्या मतमोजणीवर भरोसा नाय काय?, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. तसेच आता आचारसंहितेचा भंग होत नाही का? असा सवाल देखील राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
मावळसाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच मावळ विधानसभा क्षेत्रातील देहूगाव आणि माळीनगर परिसरात संजोग वाघेरे-पाटील यांच्या समर्थकांनी ‘खासदार’ असा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत.
‘खासदार आमच्या जनतेचा… देहूनगरीत मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर विजय निश्चित… घासून नाही ठासून… संजोगजी भिकू वाघेरे यांची प्रचंड बहुमतांनी खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!’ असा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. त्यानंतर संपूर्ण मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे. मात्र, उरण, कर्जत, मावळ विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का आशादायक आहे, तर भाजपचे प्राबल्य असलेल्या पनवेल, चिंचवड विधानसभा मतदारसंघांत मतदानाचा टक्का कमी झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून त्यांनी बॅनर लावत उमेदवाराचे आधीच अभिनंदन केले आहे.
निवडणूक आयोगाने बुधवारी बूथनिहाय मतदान आकडेवारी जाहीर केली. त्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील कार्यकत्यांनी आपापल्या बूथवर किती मतदान झाले, याचे अंदाज लावले. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना एक लाख ७० हजारांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तशा पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत.











