न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२४) :- केंद्र शासन, राज्य शासन तसेच पोलिस आयुक्तालय स्तरावर विविध माध्यमातून आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबत आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक शनिवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या कालावधीत वरिष्ठांच्या उपस्थितीत प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये तक्रार निवारण दिन होणार आहे. यामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे प्रत्यक्ष निरसन केले जाणार आहे.
नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निरसन होण्यासाठी विविध माध्यमातून तक्रारी स्वीकारल्या जातात. वेब पोर्टल, व्हाट्सअॅप, ई- मेल, प्रत्यक्ष पोलिस आयुक्त कार्यालय, पोलिस उपायुक्त कार्यालय, सहायक पोलिस आयुक्त कार्यालय, पोलिस ठाण्यांमध्ये, त्यासह राज्य शासनाचे आपले सरकार पोर्टल, केंद्र शासनाचे पी. जी. पोर्टलमार्फत या तक्रारी पोलिसांकडे येत असतात. आलेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण झाल्यास नागरिकांना न्याय मिळण्यास मदत होते. तक्रारीचे वेळेत निरसन न झाल्यास नागरिकांची गैरसोय होते. प्रत्येक शनिवारी सकाळी साडेदहाला नागरिकांनी तक्रारींसह पोलिस ठाण्यांमध्ये हजर राहण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे.
नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी तसेच नागरिकांना अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडता यावी, त्यासाठी पोलिस आयुक्त चौबे यांनी तक्रार निवारण दिन हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक शनिवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या कालावधीत पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत तक्रारी सोडविल्या जातील.











