- विनापरवाना खोदकाम करणारे फौजदारी कारवाईपासून वंचित?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२४) :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने १५ मेनंतर पिंपरी-चिंचवड शहरात रस्ते खोदकामास बंदी घातली आहे. विनापरवाना खोदकाम करताना आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, ही मुदत संपली तरी, शहरातील काही भागात खोदकाम सुरूच असल्याचे दिसत आहे.
पावसाळ्यात पाणी साचून रस्त्यांवर खड्डे पडून वाहतूककोंडी होते. तसेच, लहान-मोठे अपघात होतात. वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेने १५ मे पूर्वी रस्ते खोदकाम करून घेण्याचे आवाहन विविध विभाग आणि मोबाईल नेटवर्किंग कंपन्यांना केले होते. त्यानंतर रस्ते खोदकामास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. ही मुदत संपली तरी शहरातील काही भागात खोदकाम सुरू आहे.
भोसरी एमआयडीसीतील टेल्को रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. तर, अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते दुरुस्त करुन पूवर्वत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रस्ते खोदण्यास १५ मेपर्यंत मुदत होती. त्यानंतर ३० मेपर्यंत रस्ते दुरुस्ती केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते दुरुस्त केले जातील. रस्ते खोदकामास १५ मेनंतर कोणालाही परवानगी देण्यात येणार नाही. तसे कोणी आढळल्यास महापालिकेकडे तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.















