- झोपेचे सोंग घेतलेली ग्रामपंचायत व पीएमआरडीए प्रशासन कारवाईचे धाडस दाखविणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २० मे २०२४) :- देहूगाव-येलवाडी या मार्गावर चाकण एमआयडीसी, तळेगाव, भंडारा डोंगर आणि लगतच्या गावांकडे जाणारी वाहने सतत जात असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. या मार्गावर विनापरवाना उभारलेल्या महाकाय होर्डिंग्जमुळे अपघाताचा धोका आहे. त्यामुळे पीएमआरडीए प्रशासन कारवाई करण्याचे धाडस दाखविणार का? असा प्रश्न मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर ऐरणीवर आला आहे.
झोपेचे सोंग घेतलेली येलवाडी ग्रामपंचायत व पीएमआरडीए प्रशासन या होर्डींग्जधारकांना केवळ नोटीस बजविण्यापलीकडे काहीच कार्यवाही करत नसल्याने कारवाईचे अधिकार असलेल्या ‘पीएमआरडीए’ प्रशासनाला जाग येणार तरी कधी? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांसह वाहनचालक करीत आहेत.
अनधिकृत होर्डिंगवर स्थानिक ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून काहीच ठोस कारवाई होत नाही. स्थानिक पुढारी, पक्षांचे कार्यकर्ते तसेच अनेक गाववाल्यांचे वाढदिवस व अन्य शुभेच्छांचे फ्लेक्स या अनधिकृत होडिंगवर दर आठवड्याला झळकत असल्याने स्थानिक नेतृत्वाकडून एक प्रकारे या जीवघेण्या होर्डिंग पॉलिसीला खतपाणी मिळत असल्याची शंका उपस्थित होत आहे. या अनधिकृत होर्डिंग्जमुळे कोणताही अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करून परिसरातील सर्व बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.












