- मग आयकर रिटर्न कसा भरणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२४) :- आयकर विभागाने पॅनकार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. ही मुदत गेल्या वर्षीच संपली असून, त्यापूर्वी लिंक न करणाऱ्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहे. पॅनकार्ड बंद झाल्यामुळे करदात्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
जेव्हा एखादा करदाता आयकर रिटर्न भरण्यासाठी जातो, तेव्हा यासाठी देखील पॅनकार्ड आवश्यक असते. आता जर तुम्ही तुमचा पॅन डेडलाईनपर्यंत आधारशी लिंक केला नसेल आणि पॅन निष्क्रिय झाले असेल, तर आयटीआर कसा भरायचा, हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल, पॅनकार्डशिवाय रिटर्न भरताना अडचणी येतात, पण ते भरणे शक्य आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ऑडिटची आवश्यकता नसणाऱ्या करदात्यांसासाठी दंडाशिवाय आयटी आर दाखल करण्याची मुदत ३१ जुलै २०२४ पर्यंत आहे. अशा वेळी पॅनकार्ड निष्क्रिय झालेले करदाते आयटीआर फाईल करण्यासाठी आधार ओटीपीची मदत घेऊ शकतात. आधार ओटीपी पडताळणीच्या मदतीने बंद पॅनच्या बाबतीत आयटीआर दाखल केला जाऊ शकतो. त्यानंतर, रिटर्नची पडताळणी करण्यासाठी, करदात्यांना नेट बैंकिंग, एटीएम इत्यादी पर्यायी पद्धतीद्वारे इलेक्ट्रॉनिक सत्यापन कोड तयार करावा लागेल.
याद्वारे आयटीआर भरता येणे शक्य होणार असले, तरी रिफंड मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. कारण आयकर विभागाने स्पष्टपणे सांगितले होते की, ज्यांचे पॅन आधारशी लिंक नाही अशा करदात्यांचा आयकर परतावा दिला जाणार नाही. पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२३ पर्यंत होती. तथापि, काही शुल्क भरून पॅन अद्याप आधारशी लिक केले जाऊ शकते.
प्राप्तिकर विभागाने ज्या करदात्यांनी पॅन-आधारची जोडणी अद्याप केलेली नाही त्यांना ती येत्या ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यास सूचविले आहे. जर प्राप्तिकर कायम खाते क्रमांक अर्थात पॅन बायोमेट्रिक पद्धतीने आधारशी जोडलेला नसेल, तर अशा करदात्याचा उद्गम कर (टीडीएस) लागू दरापेक्षा दुप्पट दराने कापला जाणार आहे.गेल्या महिन्यात, प्राप्तिकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात, ३१ मेपर्यंत करदात्याने पॅन-आधार जोडणी केलेली नसल्यास, दुप्पट दराने टीडीएस वसुलीची कारवाई केली जाणार नाही, असे नमूद केले आहे. करदात्यांना टीडीएस कलेक्शनमध्ये कसूर झाल्याचे सूचित करणाऱ्या नोटिसा प्राप्त झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावर मंडळाने स्पष्टीकरणात सांगितले की, ३१ मार्च २०२४ पर्यंत झालेल्या व्यवहारांसाठी आणि ३१ मे २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी पॅन आधार जोडणी झाल्यास करदात्यांवर उच्च दराने कोणत्याही कराचा भार येणार नाही.