- पावणेतीन लाख मालमत्ता धारकांनी भरला कर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने अवघ्या 60 दिवसांत तब्बल 308 कोटींचा कर वसूल करण्यात आला आहे. विविध कर सवलतींचा लाभ घेत 2 लाख 71 हजार 503 मालमत्ता धारकांनी आपला कर भरणा केला आहे. तसेच 30 जूनपर्यंत असलेल्या कर सवलतींचा लाभ घेऊन कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
शहरात 6 लाख 30 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. गतवर्षी विभागातर्फे राबविलेले विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह सलग दुसऱ्यावर्षी महिलांच्या सिध्दी प्रकल्पा अंतर्गत बिलांचे घरपोच आणि वेळेत वाटप करण्यात आले आहे. याचीच फलनिष्पत्ती म्हणून मालमत्ता धारक कर संकलन कार्यालयासमोर अक्षरशः रांगा लावून कराचा उत्स्फूर्तपणे कर भरत असल्याचे चित्र प्रथमच दिसून येत आहे.
यावरून शहरवासीयांनी शहर विकासात हातभार लावण्याची एक प्रकारे जबाबदारी स्वीकारली आहे. 6 लाख 30 हजार मालमत्तांपैकी 2 लाख 71 हजार 503 मालमत्ता धारकांनी 308 कोटी 42 लाख 31 हजार रुपयांचा कर जमा केल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.















