- पुरातन मूर्ती आणि काही नाणी मिळाली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२४) :- विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संवर्धनाचे काम सुरू असताना एक दगड सरकला आणि त्या ठिकाणी तळघराचा रस्ता दिसून आला. या तळघरात एकच मार्ग आहे. पाच फूट बाय सहा फूट असे हे तळघर आहे. याची उंची पाच फूट आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तळघर आढळले असून, त्यामध्ये पुरातन मूर्ती आणि काही नाणी मिळाली आहेत. मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू असताना हाती लागलेल्या या खजिन्यामुळे पुरातत्व अभ्यासकांना नवी दिशा मिळणार आहे.
मंदिराच्या तळघरात शुक्रवारी सायंकाळी पुरातत्व विभाग व मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला. तेथे श्री विष्णूच्या दोन मूर्ती आणि महिषासूर मर्दिनीची मूर्ती, पादुका आणि अन्य दोन छोट्या अशा एकूण सहा मूर्ती आढळून आल्या. सोळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे यांनी व्यक्त केला. संशोधनानंतर आयुर्मान काढले जाईल.
श्री अष्टभुजा देवीची मूर्ती पाषाणाची अत्यंत सुबक असून मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा, कमळ आहे. श्री विष्णूची मूर्ती तीन ते साडेतीन फूट उंचीची आहे. या मूर्तीला चार हात आहेत. हातात शंख, गदा, त्रिशूळ आहे.
तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संवर्धनाचे काम सुरू असून रात्री दोनच्या सुमारास हनुमान दरवाज्याच्या बाजूला दगड खचल्याचे दिसून आले. या दगडाचे काम करताना आत खालील बाजूला पोकळी दिसली. तेथे तळघर असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे यादवकालीन पुरातन मंदिर असल्याची माहिती अनेक संतांच्या अभंगातून ग्रंथातून मिळते. त्यामध्ये कुठे विठ्ठल मंदिरात तळघर असल्याचा संदर्भ आहे का? ते पाहावे लागेल असे पुरातत्त्व विभागाचे विलास वाहने म्हणाले.
मंदिरातील हनुमान गेटजवळ चुना काढून नव्याने दरर्जा भरण्याचे काम सुरू असताना तेथील एक दगड सरकला व त्या दगडाखाली खोली दिसून आली आहे. आत व्यवस्थित पाहिले असता पुरातन मूर्ती दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी तळघर असू शकते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास काम सुरू असताना ही बाब निदर्शनास आली. समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच पुरातत्त्व खात्याचे अधिकारी तसेच मंदिराबाबत जुनी माहिती असलेल्या काही लोकांसमोर या ठिकाणची तपासणी करण्यात येईल, असे शेळके यांनी यावेळी सांगितले.