न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- देहु नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये आठवडे बाजारात शुक्रवारी (दि. ३१) अचानक १३ जणांवर कारवाई करीत सुमारे अकरा हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. तसेच ६० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ माझी वसुंधरा ४ अभियानाअंतर्गत देहू परिसरामध्ये प्लॅस्टिकची अंत्ययात्रा काढून प्लॅस्टिक बंदीची जनजागृती करण्यात आली होती. जनजागृती वेळी नागरिकांना प्लॅस्टिकचा वापर टाळा, असे आवाहन करून दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्या अनुषंगाने प्लॅस्टिक बंदी मोहिमेअंतर्गत धडक पथकाद्वारे बाजार भागात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
धडक पथकात नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक रामराव लेखपाल, केशव पिनाटे, शहर समन्वयक अक्षय रोकडे, बांधकाम विभाग अभियंते शाम वाघमारे, ज्ञानेश्वर निकम, दता शिंदे, अभिजित आळेकर, अविनाश सेलुरकर, नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.











