- आमचाच उमेदवार निवडून येणार; राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- मावळ लोकसभा मतदारसंघासाठीची मतमोजणी आज मंगळवारी (दि.४) होणार आहे. मतांची समीकरणे वेगवेगळ्या प्रकारे मांडून हाच उमेदवार विजयी होणार, असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून केला जात आहे.
मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड आणि पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. एकूण २५ लाख ८१ हजार ८१ पैकी १४ लाख १८ हजार ४३९ जणांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ५४.८७ टक्के आहे. मतमोजणी आज मंगळवारी (दि. ४) रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे केली जाणार आहे. त्यासाठी चौकाचौकात, हॉटेलमध्ये, पारावर बसून चर्चा घडत असून विधानसभानिहाय मतांची आकडेवारीची तोडमोड करून गणिते मांडली जात आहेत. त्यात माझाच उमेदवार विजय होणार, असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून केला जात आहे. त्यामुळे कोणी बाजी मारणार, मावळाचा नवा शिलेदार कोण असेल, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. काही उत्साही कार्यकर्ते व समर्थकांनी आपल्या उमेदवाराच्या विजयाचे फ्लेक्स लावून अभिनंदनही केले आहे. तर उमेदवारांच्या समर्थकांनी देवदर्शन घेत विजयासाठी साकडे घातले आहे. अनेकांनी आपापल्या मतानुसार विजयी उमेदवाराच्या नावावर पैजाही लावल्या आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया शांततेत व निःपक्षपाती वातावरणात पार पाडली जावी व कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार प्रवीण ढमाले यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना संहिता कलम १२९. १३३, १४३ व १४४ खाली अधिकार बहाल करण्यात आले आहेत.











