दोघा बिल्डरशी हातमिळवणी; बनावट स्टेटमेंटचा घेतला आधार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 11 जुलै 2024) :- पिंपरीतील स्टेट बँक ऑफ इंडीया, औद्योगिक वित्त शाखा येथे रिलेशनशिप मॅनेजर या पदावर असताना आरोपी यांनी पदाचा गैरवापर केला.
दरम्यान आरोपी क्र. ३ ते ५ यांच्याशी संगणमत करुन बीव्हीजी डेव्हलपर्स नावचे बनावट विनंतीपत्र बनवून त्यावर फिर्यादी व त्यांचा भाऊ भागीदार बाळासाहेब गायकवाड यांच्या बनावट सह्या केल्या. त्याद्वारे त्यांचे बीव्हीजी डेव्हलपर्स या भागीदारी संस्थेचे मंजूर मुदतकर्ज खात्यामधुन वेळोवेळी रक्कम रुपये १०,१४,१८,०००/- फिर्यादी यांच्या संमत्तीविना परस्पर आरोपी क्र १ ते ३ यांच्या फायद्याकरीता त्यांच्या वेगवेगळ्या फर्मच्या खात्यावर परस्पर वळते केले. त्यांचा फसवणूकीचा उद्देश साध्य होण्यासाठी फिर्यादी यांच्या लोन खात्याचे बनावट बँक स्टेटमेंट तयार करुन त्यावर बँकेचा शिक्का व सही करुन ते फिर्यादी यांना वेळोवेळी सादर केले.
हा गैरप्रकार फिर्यादी यांच्या निदर्शनास आल्यानंतर फसवणूकीची रक्कम परत करण्याचे वेळोवेळी आश्वासने आरोपी यांनी फिर्यादी यांना दिले. त्यापैकी आरोपी क्र २ याने परत केलेली रक्कम रुपये ३,२०,००,००० वजा करता फिर्यादी यांच्या मे. बीव्हीजी डेव्हलपर्स चे एकूण रक्कम रुपये ६,९४,१८,०००/- रु. (सहा कोटी चौ-यांनव लाख आठरा हजार रुपये) इतक्या रकमेचा संगणमताने इतर आरोपी यांनी अपहार केला. स्वतःच्या फायदयाकरीता सदर रक्कम वापरुन फिर्यादी यांची आर्थीक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमुद आहे.
हा प्रकार दि २५/१०/२०१९ ते १८/०१/२०२० चे दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडीया, औद्योगिक वित्त शाखा, कलासागर हॉटेल समोर, पिंपरी येथे घडला.
फिर्यादी बांधकाम व्यवसायीक बिभिषण व्यंकटराव गायकवाड यांनी आरोपी १) शाहबाज जफर सय्यद मोहमंद जफर (रा.ठी. फ्लॅट नं ५०२, लोढा, गहूंजे, ता मावळ) २) विजय अरविंद रायकर (वय ४६ वर्षे, व्यवसाय बांधकाम व्यवसायीक, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे), ३) गौरव सुनिल सोमाणी (वय ३५ वर्षे व्यवसाय – बांधकाम व्यवसाईक रा. सोबा सवेरा, बिबवेवाडी, पुणे), ४) महेश भगवानराव नलावडे यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
भोसरी पोलीसांनी ४३१/२०२४ भादवि कलम ४२०,४०९, ४६७,४६८, ४७१,३४ प्रमाणे चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि सपकळ तपास करीत आहेत.















