- तर, ६०० श्वानांचे अँटी-रेबीज लसीकरण केल्याचा महापालिकेचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२४) :-राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या वतीने रेबीज निर्मुलनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहराला रेबीजमुक्त शहर करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रेबीज विरोधी पथकाची स्थापना केली आहे.
या पथकामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर, पशुधन पर्यवेक्षक, श्वान पकडणारे आणि मदतनीस यांचा समावेश असून पथकाला विशेष डॉग व्हॅन आणि वैद्यकीय कामकाजासाठी वैद्यकीय वाहन देण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने रेबीज विरोधी पथकाची स्थापना मे महिन्यात करण्यात आली होती. मे महिन्यापासून या पथकाने विविध भागात १२०० पेक्षा जास्त श्वानांचे लसीकरण केले असून विशेषत: कुत्रा चावण्याच्या घटना घडलेल्या परिसरांवर लक्ष केंद्रित केले आहे. याव्यतिरिक्त, कॅनाइन कंट्रोल ऍन्ड केअर संस्थेच्या मदतीने नसबंदी केंद्रात सुमारे ६०० श्वानांचे अँटी-रेबीज लसीकरण करण्यात आले आहे. रेबीजला शहरातून हद्दपार करण्यासाठी एकाच वेळी नसबंदी आणि लसीकरणावर भर देण्यात आला आहे, ज्याचे उद्दिष्ट नागरी मर्यादेत ७० टक्के कळप प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) वाढविण्याचे आहे.
येत्या काही वर्षात रेबीजमुक्त शहर बनवण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. या रेबीज विरोधी पथकाची निर्मिती आणि स्वयंसेवकांचे एकत्रित प्रयत्न हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने एक महत्वपुर्ण पाऊल आहे. गरज पडल्यास येत्या काही दिवसांत रेबीज विरोधी पथकांची संख्या वाढविण्यावर महापालिका भर देणार आहे. तसेच या उपक्रमाला असंख्य पशु स्वयंसेवकांकडून पाठिंबा मिळाला असून त्यांनी लसीकरण मोहिमेमध्ये महापालिकेस मोलाचे सहकार्य केले आहे. स्थानिक प्राणी कल्याण संस्थांच्या सहकार्यही पथकांना लाभत असून रेबीज प्रतिबंध आणि पाळीव प्राणी मालकीबद्दल लोकांनी पार पाडण्याच्या जबाबदारीबद्दल माहिती देण्यासाठी जागरूकता मोहीम देखील महापालिका क्षेत्रात राबविली जात आहे.











