न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२४) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी दिपा मुधोळ-मुंडे यांनी महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी (दि. १५) स्वारगेट येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात त्यांनी महामंडळाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. परिवहन महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
पीएमपीच्या अध्यक्षपदाचा पदभार घेण्यास आशिष येरेकर यांनी नकार दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने ८ जुलै रोजी दीपा मुधोळ-मुंडे यांची या पदावर नियुक्ती केली. बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून त्यांची येथे थेट बदली झाली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांची लोकसंख्या ७० लाखांपेक्षा जास्त आहे. या शहरांतील दरराेजच्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता आजराेजी ‘पीएमपी’च्या ताफ्यात ३ हजार ६३८ बसगाड्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात ‘पीएमपी’कडे सुमारे १ हजार ९२८ बस आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत आणखी १७१० गाड्यांची आवश्यकता आहे. अपुरी बससंख्या, नियोजनाचा अभाव, ८०० कोटींचा तोटा आणि अंमलबजावणीतील ढिसाळपणा यामुळे ‘पीएमपी’ची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.












