- सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमावू नका..
- पर्यटनस्थळी या ‘टिप्स’ येतील तुमच्या कामी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२४) :- समाधानकारक पाऊस पडल्यानंतर मावळ तालुक्यातील निसर्ग सौंदर्य, धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. पर्यटनस्थळी पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. मात्र काही पर्यटकांना सेल्फीचा मोह आवरत नसल्याने ते धोकादायक ठिकाणी जात सेल्फी काढण्याच्या नादात आपला जीव गमावतात. कुंडमळा येथे दरवर्षी अशा दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे शेलारवाडी येथील कुंडमळ्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे
काही दिवसापूर्वीच लोणावळा येथील भुशी धरणाजवळ पाच पर्यटक वाहून गेल्याची मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे प्रशासन यंत्रणा अलर्ट झाल्या असून पर्यटकांना विविध सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच पर्यटनस्थळी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वर्षा विहाराच्या आनंदात सेल्फी काढण्याच्या नादात आणि पाण्यात भिजण्याच्या आनंदात अपघाताला निमंत्रण देणारे पाडस करू नये, असे सांगण्यात आले आहे.
पावसाळ्यामध्ये मावळातील बेगडेवाडी स्थानकाजवळील शेलारवाडी येथील रांजण खळग्यांचा कुंडमळा पर्यटकांना आकर्षित करतो. या ठिकाणी कुंडमाता देवी मंदीर, मंदिराजवळ असलेला बंधारा, साकव पूल, मोठ्या प्रमाणात लहान व मोठमोठे अनेक रांजणखळगे आहेत. येथील नयनरम्य निसर्ग आणि आकर्षक पाण्याचा प्रवाह पर्यटकांना आकर्षित करतो. अशा ठिकाणी पर्यटकांना सेल्फीचा मोह आवरत नाही आणि धोकादायक व निर्जन ठिकाणी जाऊन पर्यटक सेल्फी काढत असतात. त्यामुळेया ठिकाणी दरवर्षी अपघातांच्या घटना घडल्या आहेत.
अशा अपघातांचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. कुंडमळा येथील रांजणखळग्यात पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्यात पाय पसरून पडल्यानंतर बाहेर येता येत नाही. पाण्यात पडल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात तसेच खळग्यात निर्माण झालेल्या पाण्याच्या भोवऱ्यात व्यक्ती अडकल्यानंतर वाचण्याची शक्यता नसते. भोवरे मोठ-मोठे असल्याने मृतदेहाच्या शोधासाठी आपदा मित्रांनाही मोठी कसरत करावी लागते.
लोणावळा येथील दुर्घटना, त्यानंतर ताम्हणी घाटाजवळील धबधबा यामध्ये घडलेली दुर्घटना ताज्या आहेत. तसेच नुकतेच रायगडावरही ढगफुटी होवून प्रचंड पाण्याच्या प्रवाहाची घटना ताजी आहे. अशा दुर्घटना पाहता पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा घडणाऱ्या घटनांपासून सावधानता बाळगण्याचे आवाहन न्यूज पीसीएमसीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
हे नेहमी लक्षात ठेवा…
• एकटे फिरायला जात असाल तर त्या ठिकाणाची पूर्ण माहिती घ्यावी.
• माहिती नसलेल्या ठिकाणी रस्ता चुकण्याची शक्यता असते.
• ज्या ठिकाणाची माहिती नाही तिथे पोहायला किवा फिरायला जाऊ नये.
• पाण्याचा प्रवाह व पाण्याची पातळी वाढत असल्यास पाण्याबाहेर पडावे.
• दरी, उंच कडे, पाण्याची खोली जास्त असलेल्या ठिकाणी सेल्फीचा मोह टाळावा.















