- चिंचवडमधील सोसायटी धारकांचे केले स्थलांतर..
- नदीपात्रालगतच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२४) :- मागील चोविस तासात पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या जोरदार पावसाने चिंचवड विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी लोकवस्ती भागात पाणी शिरले. पवना नदीला पूर आला असून पुराचे पाणी सोसायटी परिसरात घुसल्याने नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा समितीचे माजी सभापती तथा मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी मदतकार्य सुरु केले आहे. नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
पुढील काही दिवसांसाठी हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुळा आणि पवना नदी पात्र दुथडी भरून वाहू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिंचवडमधील केशवनगर भागात पवनेच्या पात्रातील पाणी अनेक सोसायट्यांमध्ये घुसले आहे. पार्किंग पाण्याखाली गेल्याने रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी मा. नगरसेवक चंद्रकांत (आण्णा) नखाते आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाकडून मदतकार्य सुरु केले आहे.
तसेच, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी भागातील नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी घरात पाणी घुसल्याच्या घटना घडल्याने नागरिकांना वेळीच मदत देण्यात आली आहे. सांगवी फाटा, श्रीराम कॉलनी, मुळानगर येथील नाले तुंबून पाणी लोकवस्तीत आले आहे. नाले दुरुस्त करण्याचे काम सुरु असून रस्त्यावर आलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग काढून दिला जात आहे, अशी माहिती मा. नगरसेवक चंद्रकांत (आण्णा) नखाते यांनी सांगितली.
पावसाचा जोर वाढत चालला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने स्थलांतरित व्हावे. चिंचवड मधील सोसायटी धारकांनी काळजी घ्यावी. स्थलांतर होण्यासाठी मदत हवी असेल तर त्वरीत पिंपरी-चिंचवड महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा.
– मा. चंद्रकांत नखाते, मा. सभापती, क्रीडा समिती – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका…












