न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२४) :- चिंचवडगावातील मोरया गोसावी समाधी मंदिरात पवना नदीचे पाणी बुधवारी सकाळी शिरले. आज गुरुवारी मंदिराच्या सभा मंडपासह बहुतांशी भाग पाण्यात गेला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.
पवना धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाउस पडत आहे. नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला असून नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे. पाण्याने संपुर्ण समाधी मंदिराला वेढा घातला आहे. मुख्य मंदिरासह अन्य सात समाधी मंदिरांमध्ये पाणी शिरले आहे. मंदिर परिसरात पाणी शिरले की, पाऊस काळ चांगला झाला अशी आख्यायिका आहे.
पावसाचा असाच जोर वाढल्यास पाणी पातळी अजून वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी आणि सतर्कता बाळगावी. तसेच मंदिर व नदीकाठ परिसरात सेल्फी काढणे, स्टंटबाजी करणे व परिसरात गर्दी करणे या गोष्टी टाळाव्यात,अशा सूचना मंदिर प्रशासन, चिंचवड पोलिस व पिंपरी- चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत.












