न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२४) :- पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नरमधील घाट माथ्यावरच्या शाळा उद्याही शुक्रवार दि. २६ जुलै रोजी बंद राहतील. या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काढला आहे.
या आदेशात म्हटले आहे, प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरुन जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून प्रदान करण्यात आले आहेत. आपती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावित झाले आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यतील खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नरमधील घाट माथ्यावरच्या शाळांना उद्याही सुट्टी जाहीर केली आहे.


















