न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२४) :- गेल्या काही तासात पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोसायट्यांमधील किंवा गृहसंस्थांमधील पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पावसाच्या पाण्यामुळे अथवा दूषित पाणी गेल्यामुळे वापरण्यास अयोग्य झालेले असू शकते.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
तथापि, दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करुन घ्यावी व पाण्याच्या टाकी सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून घरगुती वापरामध्ये पिण्यासाठी वापरात येणारे पाणी उकळून व गाळून घेण्यात यावे. ज्यामुळे जलजन्य रोगांचा प्रसार होणे टाळता येईल, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.














