- फोटोसेशन जोमात; डेंग्यूमुक्तीसाठी इच्छाशक्तीची खरी गरज..
- घर सर्वचजण स्वच्छ ठेवतात; सार्वजनिक स्वच्छतेच?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२४) :- पिंपरी चिंचवड शहर डेंग्यूज्वराने फणफणले आहे. महापालिका उपाययोजना सुरु असल्याचा ढोल बडवतेय. त्यातच नुकत्याच आलेल्या पावसाने हाहाकार माजविला असून शहरात सर्वत्रच अस्वच्छता पसरलेली आहे.
अस्वच्छतेमुळे डासांना आणि पर्यायाने डेंग्यूला आयतेच खतपाणी मिळत आहे. अशात शहराची काळजी असणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन शहरात स्वच्छता अभियान राबवायचे सोडून, घरातील केरकचरा काढायची नौटंकी त्यांच्याकडून सुरु आहे. त्याचं फोटोसेशनदेखील जोमात होत आहे. अगदीच माजी नगरसेवक, आमदार, खासदार पालिकेचे बडे बाबू यात आघाडीवर आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड’ शहर करण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांना आठवड्यातून दर रविवारी ‘एक दिवस एक तास’ स्वतःच्या घरी स्वच्छता अभियान राबवण्याबाबत आवाहन केलं. त्या आवाहनाला सर्व स्तरातून अत्यंत चांगल्या स्वरूपाचा प्रतिसाद मिळत आहे. दर रविवारी शहरातील मान्यवर स्वतःच्या घरी साफसफाई करतात. त्याचा फोटो महापालिकेला पाठवतात.
मुळात प्रत्येक जण स्वतःच घर स्वच्छ ठेवतोच. आरोग्याचीही काळजी घेतो. परंतु, सार्वजनिक आरोग्याची काळजी कोण घेणार? शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी फक्त पालिकेची नाही, सर्वांची आहे. आज रस्त्यावरून जाताना जागोजागी दुतर्फा अस्ताव्यस्त फेकलेला कचरा आढळतो. त्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते. रस्त्यावरील बहुतांशी स्वच्छतागृहात स्वच्छता नसते. मोकाट कुत्र्यांमुळे कचरा रस्त्यावर इतरत्र पडलेला आढळतो. त्याकडे सर्वचजण कानाडोळा करतात. पालिकेचे कर्मचारी याला किती पुरणार. मुळात लोकप्रतिनिधींचा प्रभागातील नागरिकांवर प्रभाव असतो. नेत्यांच्या एका शब्दावर त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून स्वच्छता अभियान राबवू शकतात परंतु, इच्छाशक्तीचा अभाव जाणवतो.
‘डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड’ शहर या उपक्रमात लोकसहभाग उस्फुर्त आहे. स्वतःच्या घरापासून डेंग्यू मुक्त अभियानाची सुरुवात होत आहे. घरामध्ये डास असू शकतात. त्यासाठी सर्वांनी घरामध्ये स्वच्छता केली पाहिजे. – मा. किरण गायकवाड, विशेष अधिकारी, पिं. चिं. मनपा…
आपपल्या प्रभागात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता कशी राहील? याची काळजी सर्वांनी घेतली तर, स्वच्छतेचा देखावा करण्याची कोणावरही वेळ येणार नाही. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ व डेंगूमुक्त होण्यास त्याचाच हातभार लागणार आहे, असं मत शहरातील नागरिक व्यक्त करू पाहत आहेत.












