न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०१९) :- कासारवाडी येथील यशवंत सोसायटीजवळ ड्रेनेजचे काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत ड्रेनेजचे काम करणारे दोन मजूर गंभीर जखमी होऊन चार वर्षाचा बालक ठार झाला आहे. ड्रेनेजच्या कामासाठी खोलवर खोदकाम करत असताना शेजारी असलेल्या संरक्षक भिंतीला कोणतीही संरक्षक उपाययोजना नव्हती. त्यामुळे भिंत कोसळून ही दुर्घटना घडली होती. या घटनेस दोषी मनपा अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात साने यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जलनिसारण विभागामार्फत जलनिस्सारण नलिका टाकण्याचे काम चालू आहे. या ठिकाणी जेसीबीने खोदकाम करताना यशवंत प्राईड या अचानक इमारतीची सिमाभिंत कोसळून लोकेश ठाकूर हा मुलगा गंभीर जखमी झाला व नंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला व याच अपघातामध्ये इतर दोन मजुर जखमी झालेले आहेत. ते मनपाच्या वाय.सी.एम. रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.
सुकृतदर्शनी या अपघातामध्ये मनपाचा ठेकेदार व मनपाचे अधिकारी दोषी असल्याचे दिसून येते. हे काम करीत असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षितेची साधने वापरण्यात आली नव्हती. कसल्याही प्रकारचे बॅरीकेटस् लावण्यात आले नव्हते. त्यामुळे या चिमुरड्याचा मृत्यू झालेला आहे व नाहक दोन गरीब मजुर जखमी झालेले आहेत.
तरी, आपणांस विनंती आहे की, या अपघातासाठी संबंधित ठेकेदार व मनपा अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात येऊन, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच जखमींना व मृत्यू पडलेल्या मुलास मनपामार्फत योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी साने यांनी या पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे.











