- दोघांनी जीव गमावला; एकजण वाचला..
- मोशीतील वैदिक विद्यालयातील मुलांचा हकनाक बळी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२४) :- इंद्रायणी नदीची पूजा करण्यासाठी गेलेल्या मुलाचा जीव वाचविताना दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १९) सकाळी साडेआठ वाजता मोशी येथील तापकीर वस्ती येथे घडली आहे. पूजा करणारा जय ओमप्रकाश दायमा (वय १९, रा. वणी, नाशिक) सुखरूप असून, वाचविणाऱ्या ओंकार पाठक (१६), प्रणव पोतदार (१६) या दोघांचा जीव गेला आहे. त्यातील ओंकारचा मृतदेह सापडला असून, प्रणवचा शोध सुरू होता. दरम्यान त्याचाही मृतदेह सापडल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी परिसरातील हवालदार वस्ती महेश नंदे गुरुजी यांचे वैदिक विद्यालय आहे. तेथील ७१ मुले सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास श्रावणी सोमवारनिमित्त नदी पूजनासाठी इंद्रायणी नदीवर गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने जय दायमा हा नदीत पडला. ही बाब लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी प्रणव रमाकांत पोतदार (वय १७, रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड), ओंकार श्रीकृष्ण पाठक (१६, रा. पद्मावती गल्ली, लातूर), अर्चित दीक्षित, चैतन्य पाठक, महेश नंदे गुरुजी हे पाण्यात उतरले. तर त्यात दायमा यांच्यासह अर्चित, महेश नंदे हे पाण्याबाहेर आले. ओंकार आणि प्रणव हे दोघे पाण्यात बुडाले. त्यानंतर या घटनेची माहिती महेश नंदे गुरुजी यांनी पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागास दिली. त्यानंतर ‘एनडीआरएफ’, पिंपरी चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभाग,वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि आळंदी येथील एक पथक घटनास्थळी दाखल झाले. सात पाणबुडे आणि सहा बोटींच्या माध्यमातून शोधकार्य सुरू झाले. तर नंदे गुरुजी आणि जय यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.
जय दायमा याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत. शोधकार्यात पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे जवान दिलीप गायकवाड, गौतम इंगवले, मोशी उपकेंद्राचे कर्मचारी सुशीलकुमार राणे, संभाजी दराडे, सूरज गवळी यांच्यासह ८० जणांचा सहभाग होता.
आपत्ती व्यवस्थापनप्रमुख ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, “ज्या ठिकाणी अपघात घडला, तिथे कोणताही घाट किंवा पूजा करण्यासाठी सुरक्षित जागा नव्हती, असे दिसून आले. अशा ठिकाणी मुलांना नेणे चुकीचे होते.












