- बस वेगात दामटून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला केलं जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २० ऑगस्ट २०२४) :- तळेगावातील इंद्रायणी कॉलेज परिसरातील बस थांब्यावर पीएमपी बस थांबली होती. बसमध्ये चढताना एक पाय वर असतानाच पीएमपी बस चालकाने बस दामटली. त्यामुळे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा तोल जाऊन ती खाली पडली.
दरम्यान चालकाने मुलीची विचारपूस न करता, तिला उपचारासाठी दवाखान्यात न नेता तिथून पळ काढला. जखमी अवस्थेत असताना मुलीने दुसरी बस गाठली आणि त्या बसचा मागून फोटो काढला. त्यामुळे बसचा क्रमांक मिळाला. हा प्रकार मंगळवारी (दि. २०) रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडला.
याबाबत जखमी मुलीने पीएमपीएमएलकडे चालकाची ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. अबोली चंद्रकांत जाधव, असं जखमी मुलीचं नाव आहे. तिच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान तळेगाव पोलीस ठाण्यात चालकाविरोधात तक्रार दाखल करण्याचं काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
पीएमपी बस चालक बस वेळेत पोहोचावी यासाठी धोकादायक पद्धतीने बस चालवीत आहेत. त्यामुळे अपघातात वाढ होत आहे. अशाने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचा जीवही जाऊ शकतो. या अपघाताला जबाबदार पीएमपी बस चालकावर कारवाई व्हावी.
– चंद्रकांत जाधव, व्यवस्थापक – श्री संताजी महाराज जगनाडे मंदिर, सुदूंबरे ता मावळ जि पुणे…











