- मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधले शिवबंधन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२४) :- मोठ्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेले माजी बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे यांनी अखेर आज मंगळवारी (दि.२०) रोजी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, आमदार मिलींद नार्वेकर यांच्यासह शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
रवी लांडगे हे भाजपचे माजी शहराध्यक्ष, दिवंगत नेते अंकुशराव लांडगे यांचे ते पुतणे आहेत. तसेच माजी विरोधी पक्ष नेते बाबासाहेब लांडगे यांचे ते पुत्र आहेत. घरातूनच राजकीय वारसा मिळाल्याने लहानपणापासूनच रवी लांडगे राजकारणात सक्रिय आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. लांडगे कुटुंब हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील अत्यंत जुने आणि निष्ठावंत कुटुंब म्हणून ओळखले जाते. मात्र रवी लांडगे यांनी केलेला हा प्रवेश उद्धव ठाकरे गटासाठी नवसंजीवनी देणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.











