न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २१ ऑगस्ट २०२४) :- मिळकत कर वेळेत न भरल्याच्या कारणावरून परंदवडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच यांच्यासह इतर दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे, याबाबतचे आदेश पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिले आहेत. विद्यमान सरपंच अलका दत्तात्रय पापळ, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिवराम पापळ व दामू गणपत ठाकर अशी अपात्र सदस्याची नावे आहेत.
२०२१ मध्ये सर्व सदस्यांनी मिळकतीची थकबाकी भरण्याबाबत ग्रामपंचायतीने नोटीस बजावली होती. परंतु ९ पैकी ६ सदस्यांनी मिळकत कर भरला व ३ सदस्यांनी मिळकत कर भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ग्रामस्थ चंद्रकांत रामभाऊ भोते व भरत बबन भोते यांनी सदर सदस्यांना अपात्र करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे दावा दाखल केला होता. ग्रामपंचायतीने सदस्यांना पाठविलेल्या बिलावरील पोहोचमध्ये असलेल्या तारखा संदिग्ध असल्याचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी दावा फेटाळला होता. त्यानंतर भोते यांनी यांच्या निकालाविरोधात विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केले होते. या सर्व प्रक्रियेत अपीलकर्त्यांकडून अॅड. मनोहर जोशी यांनी बाजू मांडली. वर्षापूर्वीच अलका दत्तात्रय पापळ यांची सरपंचपदी निवड केली होती. या तिन्ही सदस्यांचा कार्यकाल फेब्रुवारी २०२६ मध्ये पूर्ण होणार होता.
ग्रामपंचायत सदस्यच जर ग्रामपंचायत कर बुडवत असतील तर ग्रामस्थ कसा कर भरतील?. यामुळे ग्रामस्थामध्ये चुकीचा संदेश जाईल, या उद्देशाने आम्ही या सदस्यांविरुद्ध अपील दाखल केले होते. विभागीय आयुक्तांनी सदर सदस्यांना अपात्र करत आम्हाला न्याय दिला आहे.
चंद्रकांत भोते, माजी उपसरपंच, परंदवडी…















