- राज्य परिवहन विभागाकडून परवाना शुल्कात भरमसाठ वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२४) :- महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार राज्य परिवहन विभागाने डुप्लिकेट वाहन परवान्याचे (ड्रायव्हिंग लायसन्स) शुल्क ४०० रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना आता डुप्लिकेट वाहन परवान्यासाठी ६५८ रुपये मोजावे लागणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर शुल्क वाढविल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी मोटार वाहन कायदा १९८८ नुसार ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. राज्यात दरवर्षी सरासरी ११ लाख नागरिक नवीन ड्रायव्हिंग लाससन्स काढतात. वाहनचालक लायसन्स हरवले, तुटले, खराब झाले, फोटो दिसेनासा झाला अशा विविध कारणांस्तव डुप्लिकेट लायसन्स काढतात.
राज्यात दरवर्षी सरासरी १.५० लाख नागरिक डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स काढतात. मात्र, आता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या २०२१ च्या अधिसूचनेनुसार डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्सचे शुल्क वाढविण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी ऑगस्टपासून या निर्णयाची राज्यातील सर्व परिवहन कार्यालयात अमंलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरला (एनआयसी) ऑनलाईन दर अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत.











