न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांमधील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सर्वांगीण विकास केंद्र उभारण्यात येतील त्यासाठी संजय गांधीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आदर्श ठरेल, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने ‘योजक’ स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने मोशी येथील संजय गांधी नगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उभारण्यात आली आहे. या अभ्यासिकेचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय रामगुडे, उप अभियंता मोहन खोंद्रे, योजक संस्थेच्या संस्थापिका रेणू इनामदार, योजक संस्थेचे प्रकल्प प्रमुख शाम वावरे, व्यवस्थापक सेजल जोशी, महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, अभ्यासिका निर्माण करण्यासाठी प्रयत्न करून हा उपक्रम यशस्वी करणारे सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा सत्कार आयुक्त सिंह यांनी केला.
शिक्षणाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना विकासाची संधी मिळते, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना अभ्यासासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होऊन त्यांची गुणवत्ता सुधारते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेमध्ये योजक या संस्थेच्या वतीने ने ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि करियर विषयक मार्गदर्शन करण्यात येणार असून झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाने वस्तींमध्ये सुरु केलेली ही पहिलीच अभ्यासिका आहे.














