- कंपनी बंद करून फरार; कोटींची फसवणूक..
- आर्थिक गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशमधून दोघांच्या आवळल्या मुसक्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२४) :- वाकड येथील भूमकर चौकातील रेंटोला इंडिया कंपनीच्या नावाने ७३२ गुंतवणूकदारांना संचालक व भागीदारांनी आकर्षक गुंतवणूक योजना व त्यावर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे सात कोटींचा गंडा घातला होता. कंपनी अचानकपणे बंद करून त्याबाबत गुंतवणूकदारांना कोणतीही पुर्व सुचना न देता रेंटोला इंडिया कंपनीचे संचालक व भागीदार सन २०२३ पासून पसार झाले होते. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचुन (दि. १७) रोजी नोएडा, उत्तरप्रदेश येथुन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
रेंटोला इंडिया कंपनीचे संचालक व भागीदार १) संदीपकुमार लाल बहादुर, (रा. प्लॉट नं ८०५, बी विंग, सप्तगिरी अपार्टमेंट, बाणेर, पुणे मूळ राहणार नरईपुर, पोस्ट रगडीह, आझमगढ, उत्तर प्रदेश), २) सीमा मित्तल (रा. सुशीलकुमार हाऊस नं. ५६७ मिठन मोहल्ला कलंदरीगेट करनाल रूरल पार्ट १ करनाल हरियाणा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाडे तत्वावर घेतलेली ई- अॅटोरिक्षा पेटीएम मॉल, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, झोमॅटो, स्विगी, झेप्टो, लाईमरोड, बीग बास्केट इ. कंपन्यांमध्ये भाडेतत्त्वावर लावुन दरमहा ३१,००० रू. भाडे कमवा व सोन्याचे व चांदीचे नाणे बुकिंग करतेवेळी मिळवा अशी जाहिरात केली. ब्रोशरमध्ये “आवर डिलिव्हरी पार्टनर्स” या नावाने असोसिएटस् अॅन्ड पार्टनरस् म्हणुन पॅजियो, महिंद्रा बजाज व इतर कंपन्यांची जाहिरात केली आहे. ब्रोशरमध्ये रेंटोला फ्रेंचाईजी फी मॉडयुल १,२,३ रुपये १) ४,७५,०००/- २) ६,७५,०००/- ३)१२,७५,०००/- व १५,७५,००० रुपये अशी फ्रेंचाईजी योजना तयार केली. त्यासाठी आरोपीने कंपनीचे ऑफिस अहमदनगर, तसेच वाशी, मुंबई येथे देखील सुरू करून त्याठिकाणी देखील नागरिकांची फसवणूक केली आहे. तसेच गुंतवणूकदारांना अॅटो ई- रिक्षा करीता १,११,०००/-रू अॅटो ई-रिक्षामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. काही गुंतवणूकदारांकडुन रोख रक्कम गुंतविल्यास त्यावर परतावा देण्याकरीता रक्कम स्विकारली आहे. तसेच त्यांच्याकडुन भाडेतत्त्वावर घेतलेल्या रिक्षा कोणतेही कंपनीस भाडेतत्त्वावर न देता त्यातील काही रिक्षा कंपनीच्या शोरूममध्ये डेमो रिक्षा म्हणून ठेवल्या व काही रिक्षा या थेरगाव येथील पार्किंग जागेत बेवारसरित्या पार्क करून ठेवल्या होत्या.
दरम्यान आरोपी दोघ (दि. २३/०९/२०२४ पर्यंत) पोलीस रिमांडमध्ये असुन त्यांचा तपास सुरू आहे. तसेच गुंतवणूकदारांनी कंपनीस भाडेतत्त्वावर दिलेल्या ६१ ई रिक्षा पैकी ३७ न्यायालयाच्या आदेशान्वये रिक्षा मालकांच्या ताब्यामध्ये परत दिल्या आहेत. पुढील रिक्षा देण्याची कार्यवाही सुरू आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत रेटोंला इंडिया कंपनी मार्फत फसवणुक झाली असल्यास आर्थिक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.















