न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- अन्नधान्यावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झालेला असताना बाजार आवारातील नियमन कर (सेस) रद्द करण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी राज्यभरातील व्यापाऱ्यांकडून मंगळवारी (२७ ऑगस्ट) लाक्षणिक बंद पाळण्यात येणार होता. महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीकडून मंगळवारी (२७ ऑगस्ट) पुकारलेला एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला.
राज्यभरातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा बंद ठेवून व्यापऱ्यांकडून राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात येणार होते. या बंदमध्ये दी पूना मर्चंटस चेंबर (पुणे) यासह राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या प्रमुख संघटना बंदमध्ये सहभागी होणार होते.
अन्नधान्यावर जीएसटी लागू करण्यात आलेला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर बाजार समितीकडून नियमन कर आकारण्यात येत आहे. कायदेशीर मापविज्ञान कायदा नियम ३ (लिगल मेट्रोलॉजी ॲक्ट) मध्ये प्रस्तावित बदल करण्यात येऊ नये, तसेच जीएसटी कायदा सुलभ करण्यात यावा आणि खरेदीवरील (सेटऑफ) अडचणी दूर करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी बंद पाळण्यात येणार होता.
बंदची व्याप्ती विचारात घेऊन राज्यशासनाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर व्यापाऱ्यांचा बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.