न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी चाकणच्या मर्सिडीज बेन्झ कंपनीला अचानक भेट दिली. या भेटीबाबत मंडळाने ‘एक्स’ समाजमाध्यमावर माहिती दिली आणि नंतर ही हटविली. त्यामुळे या भेटीमागे नेमका काय उद्देश होता, असा सवाल आता केला जात आहे.
माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली निवड वादग्रस्त ठरली होती. त्यातच खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या सिद्धेश कदम यांनी शुक्रवारी चाकणच्या मर्सिडीज प्रकल्पाचा दौरा केला होता.
वास्तविक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बरोबर असणे आवश्यक असताना ३०-३५ खासगी व्यक्तींना घेऊन कदम तेथे गेले. सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नियमांचे पालन होत नसल्याने पाहणी करण्यासाठी हा दौराअसल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शविवारी देण्यात आली होती. मात्र, यावरून टीका होताच ‘एक्स’ समाज माध्यमावरून या पाहणीचा तपशील हटविण्यात आला. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोणतीही नोटीस बजाविण्यात आलेली नसल्याचे कंपनीनेही स्पष्ट केले. मात्र, सोमवारी पुणे प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण विभाग कारखान्याला नोटीस देणार असल्याचे सांगण्यात आले.
विरोधकांनीही या भेटीवरून सरकारला लक्ष्य केले. राज्यात मोठे प्रकल्प येत नसताना जे उद्योग सुरू आहेत, त्यांना अशा प्रकारे त्रास देणे योग्य आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सिद्धेश कदम यांची नियुक्ती अयोग्य असल्याचे त्यावेळीच निदर्शनास अणून दिले होते. त्यांनी नको ते उद्योग केल्यास राज्यावर नामुष्की ओढवू शकते, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.