- माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नुकतेच मालवन येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत मानले जातात. महाराज म्हणजे महाराष्ट्राचा किंबहुना मराठी माणसाच्या अस्मितेशी जोडला गेलेला भावनिक मुद्दा आहे. ज्या कारागिराला पुतळा बनविण्याचे काम देण्यात आले होते. त्याचा एकुनच कामाचा अनुभव पाहता एवढा मोठा महाराजांचा पुतळा बनविण्याचे काम त्यांना दिलेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुतळा कोसळल्यामुळे महाराजांच्या पुतळ्याची विडंबना झाली आहे. समाजमाध्यमातून, प्रसिध्दी माध्यमातून टिकेची झोड उठली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोप-यातून आलेले विविध धर्मिय, विविध समाज बांधव वास्तव्य करत आहेत. त्यांच्या मागणीचा विचार करुन पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात महापुरुषांचे मोठमोठे पुतळे स्थापन केले आहेत. त्यामुळे शहराला पुतळ्यांचे शहर म्हणून देखील अभिमानाने ओळखले जाते. परंतु, या पुतळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. असंख्य ठिकाणी पुतळ्यांचे सुरक्षेसाठी त्याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमलेला नाही. पुतळ्यांची वेळेवर स्वच्छता देखील केली जात नाही. उद्या मालवन येथील पुतळ्याची पुनर्रावृत्ती शहरात घडली तर त्याला कोण जबाबदार, यामुळे वेळीच सावधानता बाळगून शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. जेणेकरुन भविष्यात पुतळा कोसळण्याची दुर्घटना टळू शकेल, असे या निवेदनात
चंद्रकांत नखाते यांनी म्हटले आहे.
—















