- शहर अभियंता मकरंद निकम यांचे यंत्रणांना आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात विविध महापुरुषांचे ३९ पुतळे असून, या सर्व पुतळ्यांचे १५ दिवसात ऑडिट करण्यात येणार आहे. ऑडिटमध्ये काही बाबी निदर्शनास आल्यास तत्काळ पुतळ्याची दुरुस्ती करावी, असा आदेश शहर अभियंता मकरंद निकम यांनी स्थापत्य विभागाच्या सर्व कार्यकारी अभियंत्यांना मंगळवारी (दि. ३) दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्यासह महापुरुषांचे तब्बल ३९ पुतळे उभारण्यात आले असून, या सर्व पुतळ्यांचे १५ दिवसात ऑडिट करण्यात येणार आहे.
शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात ३९ पुतळे आहेत. यामधील काही पुतळे हे आडबाजूला आहेत. तर काही पुतळे दर्शनी भागात आहेत. या पुतळ्यांकडे महापालिका किया सामाजिक संस्था या फक्त जयंती आणि पुण्यतिथीला लक्ष देतात. बाकी वर्षभर पुतळ्यांकडे कोणीही बघत नसल्याचे विदारक चित्र शहरात आहे.
‘ह’ प्रभागात सर्वांत जास्त पुतळे….
शहरात महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयाअंतर्गत तब्बल ३९ पुतळे उभारण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक पुतळे हे ह प्रभाग कार्यालय क्षेत्रात १५, त्यानंतर अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात ११. ग कार्यालय क्षेत्रात ५ आणि इतर पाच प्रभागात ८ असे ३९ पुतळे आहेत.
मालवण घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पुतळ्यांचे १५ दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. ऑडिटमध्ये काही बाबी निदर्शनास आल्यास तत्काळ पुतळ्याची दुरुस्ती करावी, अशा सूचना स्थापत्य विभागाच्या सर्व कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.
– मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका…












