- ‘व्हर्चुअल टाउनहॉल’ द्वारे साधला नागरिकांशी थेट संवाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडीतील बालसुरक्षा, वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेसंबंधी नागरिकांनी मांडलेल्या समस्या जाणुन घेत, त्या सोडविण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ‘व्हर्चुअल टाउनहॉल’ सत्राद्वारे केला. बुधवारी (दि. ४) रोजी सोशल मिडिया (एक्स – पुर्वीचे ट्विटर) वर नागरिकांशी त्यांनी थेट संवाद साधला.
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत नागरिकांनी मुद्दे उपस्थित केले. त्यात सीसीटीव्ही देखरेख, शालेय कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी, पॉक्सो मार्गदर्शक तत्त्वांचे प्रशिक्षण आणि सुरक्षा रक्षकांची उपस्थिती यावर चर्चा झाली. पोलीस आयुक्त यांनी डिसेंबर २०२३ मध्ये सुरू केलेल्या ‘वन डे फॉर स्कूल’ या उपक्रमाचा उल्लेख केला. या उपक्रमाद्वारे ३०० हुन अधिक शाळा आणि ६५,००० विद्यार्थी यांना गुड टच आणि बैड टच याबाबत माहिती देण्यात आली आहे, तसेच पॉक्सो मार्गदर्शक तत्वांवर चर्चा करण्यात आली आहे. शाळांना सीसीटीव्ही बसविण्याची, कर्मचाऱ्यांची अनिवार्य पोलिसा पडताळणी करण्याची, विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेट्या ठेवण्याची आणि विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्याबाबत आवाहन करण्यात आले. नागरिकांनी विद्यार्थ्यांसाठी पॉक्सो मार्गदर्शक तत्त्वे व माहितीपर सत्र आयोजित करण्याची मागणी केली. त्यावर पोलीस आयुक्त यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी व अंमलदार हे सर्व शाळांमध्ये प्रशिक्षण व माहीती देण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याबाबत शाळांनी व्हॉट्सअॅपद्वारे (९५२९६९१९६६) संपर्क साधावा.
नागरिकांनी वाहतूक कोंडीबाबतचे प्रश्न विचारले. त्याबाबत आयुक्त म्हणाले, वाहतूक शाखा, PCMC, PWD, आणि NHAI यांनी संयुक्तपणे २६ वाहतूक कोंडीचे पॉइंट्स ओळखले आहेत, ज्यावर उपाययोजना अंमलबजावणी सुरु आहे. चाकणमध्ये, तळेगाव चौक आणि आळंदी फाटा यासह ११ ठिकाणांवरील अतिक्रमण काढण्यात आले आहेत. हिंजवडीत, विप्रो सर्कल आणि राधा चौक यांसारख्या प्रमुख भागांचा आढावा घेतला जात आहे. रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियमन उपाययोजना सुरू आहेत.
सायबर गुन्हे, विशेषतः ऑनलाइन फसवणुकींमध्ये वाढ, शेअर बाजारात गुंतवणूक फसवणूक या ऑनलाईन टास्क फ्रॉडवरही चर्चा झाली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी यावर्षी २१६ सायबर गुन्ह्यांची नोंद केली असून ७२ जणांना अटक करण्यात आलेली आहे. २.५ कोटीहून अधिक रक्कम पीडितांना परत करण्यात आली आहे. तसेच, २७ कोटींची रक्कम होल्ड/लिन करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलद्वारे किंवा १९३० या क्रमांकावर कॉल करून तात्काळ सायबर फसवणुकीची तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गणेश उत्सवाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी शांतता समित्यांच्या बैठका, गणपती मंडळे आणि इतर सरकारी विभागांसोबत बैठका आयोजित करुन समन्वय साधला आहे. संपूर्ण उत्सव काळात वाहतूक व्यवस्थापनाकडे पोलिसांचे विशेष लक्ष असेल. सणाच्या काळात ध्वनी प्रदूषणाशी संबंधित आदेश/मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी गणेश मंडळांना परवाने सुलभतेने मिळवण्यासाठी एक खिडकी प्रणाली सुरू केली आहे. तसेच विसर्जन मार्गाचे विश्लेषण करून वाहतूक वळविण्याचे नियोजन केले आहे. लवकरच याबाबत सविस्तर पत्रक काढण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.












