न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२४) :- पुण्यातील समाधान चौकात अचानक रस्ता खचल्याने संपूर्ण ट्रकच नाल्यात गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. पुण्यातील सीटी पोस्टजवळ अचानक रस्ता खचला आणि संपूर्ण ट्रकच हा खड्ड्यात गेला.
जिथे हा खड्डा पडला त्याच्या खाली मोठा नाला असल्याने ट्रक हा नाल्यातच गेला. मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेचा हा ट्रक असून काही मटेरिअल घेऊन तो समाधान चौकात आला होता. जिथे दुरुस्तीचं काम सुरू होतं. हा ट्रक जेव्हा तिथे आला त्यावेळी तेथील पेव्हर ब्लॉक हे खचले आणि अख्खा ट्रक खाली गेला.
या ट्रकमधील चालक आणि इतर लोक सुस्थितीत आहेत. अग्निशमन दलाकडून तपासणी करण्यात आली आहे. वाहन बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याची माहिती मिळू शकली नाही.











