न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२४) :- शहरातील रस्त्यांवरील पायाभूत सुविधांचा कायापालट करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी हरित सेतू प्रकल्पाला १९ सप्टेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सुमारे १३२.४३ कोटी रुपये खर्चून प्रकल्पाची उभारणी होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण भागातील ५ चौ.कि.मी क्षेत्राची या पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये अच्छादित पदपथ व सायकल ट्रॅक विकसित करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
पादचाऱ्यांसाठी, सायकलप्रेमी तसेच लहान शाळकरी मुलांसाठी आणि रहिवाशांसाठी सार्वजनिक परिसर हा स्वच्छ, सुंदर आणि उत्साहवर्धक बनवण्याच्या उद्देशाने आणि शहरातील नागरिकांमध्ये पायी चालणे, सायकल चालविणे आणि धावणे या दैनंदिन आरोग्यदायी सवयींचे महत्व रुजविण्यासाठी हरित सेतू हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नक्कीच हा उपक्रम शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी एक दिशादर्शक उपक्रम ठरेल याची मला
खात्री आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका















