- राष्ट्रवादीच्या अतिश बारणे यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२४) :- मोशी, बोऱ्हाडेवाडी येथील बारणे पाटील चौक परिसरातील गट क्रमांक २३० (१३४७) येथील ६४ गुंठ्यावर महापालिकेचे आरक्षण आहे. या ठिकाणी पालिकेचे क्रीडांगण व उद्यान होणार आहे. या संदर्भात महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठीया यांनी या ठिकाणी भेट देऊन काम सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी शहर-जिल्हा उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी दिली आहे. याबाबतीत बारणे यांनी पाठपुरावा केला होता.
याबाबत अतिश बारणे यांनी सांगितले की, पार्थ पवार व आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे मोशीतील आरक्षण विकसित होण्याबाबत निवेदन दिले होते. पार्थ पवार यांनी भेट दिली होती. यावेळी परिसरातील जवळपास २७ सोसायट्यांमधील रहिवाशांनी पार्थ पवार यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी रहिवाशांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन पवार यांनी दिले होते.
या परिसरात जवळपास १८ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या वास्तव्यास आहे. आजूबाजूला पालिकेचे कोणतेही क्रीडांगण, उद्यान नाही. त्यामुळे येथे क्रीडांगण व उद्यानाची मागणी अतिश बारणे यांनी निवदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली होती. अखेर येथील कामाला मंजुरी मिळाली असून महापालिका लवकरच काम सुरु करणार आहे. असे बारणे यांचे म्हणणे आहे.












