न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२४) :- धुळे येथुन गांजा तस्करी करुन हिंजवडी आय.टी. पार्क व शैक्षणिक संस्थाच्या परिसरामध्ये गांजा विक्री करणारे ०३ इसम ३३ किलो गांजासह अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहेत.
१) सुरेंद्रकुमार संतोष त्रिपाठी, वय ३६ वर्षे, रा मौजे म्हाळुंगे येथे भाडयाने म्हाळुंगे पुणे मुळ रा चित्रकुट, तहसिल श्रीरामपुर, जिला चित्रकुट धाम करवी, राज्य उत्तरप्रदेश २) अशोक गुलाबचंद पावरा, वय १९ वर्षे, रा मांजणी पाडा, फतेपुर फॉरेस्ट, ता शिरपुर जि धुळे ३) पवन सानु पावरा, वय १९ वर्षे, रा सदर, अशी अटक आरोपींची नावे आहेत.
हिंजवडी म्हाळुंगे परीसरात गस्त घालीत असताना पोलिसांना तीन इसम हे संशयितरित्या जात असताना मिळुन आले. त्यांच्या ताब्यातुन ९,५०,२०० रुपये किंमतीचा माल ज्यामध्ये १६ किलो १०४ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, ०२ मोबाईल व ०१ दुचाकी गाडी जप्त करुन त्यांचेविरुध्द हिंजवडी पोलीस स्टेशन गु.र.क्र. १०७४/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपीतांकडे सखोल चौकशी करुन त्यांच्याकडुन आणखी ८,५०,४५०/- किंमतीचा १७ किलो ००९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपीत हे हिंजवडी येथील आय.टी. पार्क व शैक्षणिक संस्थांचे परिसरामध्ये विक्री करत असल्याचे निष्पन्न होत आहे. गुन्हयाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक कडील सपोनि सचिन कदम हे करीत असुन आरोपीत हे दि २४/०९/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहेत.











