- भोसरीतील प्रस्तावित इमारतीत २०१ गाळ्यांची निर्मिती…
- आमदार महेश लांडगे यांची महापालिका प्रशासनाला सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२५) :- कुदळवाडीमध्ये महानगरपालिका प्रशासनाने सरसटक अतिक्रमण कारवाई केली. या कारवाईमध्ये अवैध भंगार दुकाने हटवण्यात आली. त्यात काही लघु उद्योजकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे भोसरी एम.आय.डी.सी. आरक्षण क्रमांक 40 प्लॉट क्र. टी. २०१ येथे लघु उद्योजकांचे पुनर्वसन करावे पुनर्वसन करावे, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून भोसरी एम.आय.डी.सी. आरक्षण क्रमांक ४० प्लॉट क्र. टी. २०१ येथे लघु उद्योजकांचे पुनर्वसन करण्यासाठी इमारत उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. सदर कामाला दि. १६ जून २००८ रोजी कार्यादेश देण्यात आला आहे. मात्र, काम अद्याप अपूर्ण आहे. सदर प्रकल्पामध्ये दोन इमारती असून, २०८ औद्योगिक गाळे नियोजित आहे. गाळ्यांचे क्षेत्रफळ २९२ ते ६३० चौ. फुटापर्यंत इतके आहे. वरील मजल्यावर वाहतुकीसाठी रॅम्प, फायरफायटिंग सिस्टम व लँडस्केपिंग अशा सुविधा देण्यात येणार आहे. मेटेरिअल व पॅसेंजर लिफ्टचीही सुविधा राहणार आहेत.
महापालिकेच्या धोरणानुसार, या प्रकल्पातील गाळ्यांचे वितरण पुनर्वसनास पात्र गाळे धारकांना करण्यात येणार आहे. उर्वरित गाळे लिलाव पद्धतीने वितरीत करण्याचे प्रस्तावित आहे. या इमातीमध्ये 208 गाळे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रस्तावित इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आमदार लांडगे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कुदळवाडी येथे सरसकट अतिक्रमण कारवाई केली. त्यामुळे भूमिपुत्र आणि लघुउद्योजकांचेही नुकसान झाले. या लघु उद्योजकांचे पुनर्वसन करण्याबाबत प्रशासनाने सदर प्रकल्पाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. यासाठी भोसरी एमआयडीसी येथे उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे काम तातडीने मार्गी लावावे आणि त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या 208 गाळ्यांमध्ये कुदळवाडीतील लघु उद्योजकांना प्राधान्य द्यावे. त्या अनुशंगाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसा पाठपुरावा करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.












