न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23 जून 2025) :- क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या वाड्याचा पुनर्विकास करण्यात आला आहे. येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक व राष्ट्रीय संग्रहालय या ऐतिहासिक वास्तूच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
या संदर्भात आयुक्त शेखर सिंह यांनी आदेश काढला आहे. चापेकर बंधूंच्या ऐतिहासिक वास्तूस पुनर्जीवित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध कामे करण्यात आली आहेत. हा वाडा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्याचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. येथे वाड्याचे नूतनीकरण, संरचनात्मक दुरुस्ती, पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक करण्यासह पूरक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.
स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे. त्यानंतर आयुक्त सिंह यांनी चापेकर बंधूंचा वाडा व स्मारकाचे व्यवस्थापन, देखभाल, आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या व सनियंत्रण महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे सोपविण्याचे आदेश दिले.
स्मारक संवर्धन व दुरुस्तीसाठी समन्वय राखणे. वारसा स्थळ म्हणून नोंदणी, शैक्षणिक सहली, पर्यटनाच्या सुविधा निर्माण करणे. कार्यक्रमांचे नियोजन, स्वच्छता, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांची देखरेख करणे. क्रीडा विभाग प्रमुखांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..स्मारकाचे ऐतिहासिक महत्त्व जतन करणे, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन आणि इतिहास प्रेरित शैक्षणिक उपक्रम राबविणे. दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, अशी क्रीडा विभागाची जबाबदारी राहणार आहे.












