न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23 जून 2025) :- मुंबई-पुणे महामार्गावरील निगडीपासून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी डी मार्टजवळ सेवा रस्ता आणि मुख्य रस्त्याच्या सध्याच्या रचनेमुळे सतत वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे.
यामुळे ऑटो क्लस्टर, सायन्स पार्क, एम्पायर स्क्वेअर, कोहिनूर वर्ल्ड टॉवर या महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी जाण्यास आणि तेथून परत पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी वाहनधारकांना मोठा वेळ व अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
निगडीहून पुण्याकडे जाताना डीमार्टजवळ सेवा रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. मात्र, त्याच सेवा रस्त्यावर पुढे तनिष्क शोरूमजवळून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी मार्ग नाही. परिणामी, वाहनांना काळभोरनगर येथील एक्झिट पकडावी लागते आणि चिंचवड परिसरातील चौकांमधून वाट काढत जावे लागते. या वाटचालीत ऑटो क्लस्टर, सायन्स पार्क, एम्पायर स्केअर आणि कोहिनूर वर्ल्ड टॉवरकडे जाणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकतात.
वरील ठिकाणांवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना फिनोलेक्स चौक (अहिल्यादेवी चौक) व पुढे आंबेडकर चौक पार करत पुन्हा मुख्य मार्गावर जाता येते. या ठिकाणी नेहमीच गर्दीचा उच्चांक नेहमी दिसून येतो. वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीचा गतीमान प्रवाह अडतो व वेळेची मोठी नासाडी होते.
वाहतूक सुलभ करण्यासाठी नागरिकांनी सुचवले आहे की, डी मार्टजवळ सेवा रस्त्याचा सध्याचा प्रवेशमार्ग एक्झिट स्वरूपात बदलावा, म्हणजेच येणारी वाहने तिथून बाहेर पडू शकतील. तसेच, तनिष्क शोरूमजवळ एक नवीन प्रवेशद्वार तयार करून वाहनांना मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी परवानगी द्यावी.
















