न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०१९) :- पीएमपीएल बसला बोर्ड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांना पळापळ करावी लागते. याची दखल पीएमपीएमएल प्रशासनाने घेतली आहे. यापुढे बसवर बोर्ड नसल्यास दंड होणार आहे. वेळोवेळी आदेश व सूचना देऊनही काही बसेसना रुट बोर्ड, विद्युत व्यवस्था नसल्याचे पीएमपीएमएलच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीमध्ये निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
रुट बोर्ड न लावणे हा वाहतूक संस्थतील अत्यंत गंभीर गुन्हा आहे. बसला पुढील व मागील दोन्ही बोर्ड व रात्रीचे वेळी बोर्डला लाईट व्यवस्था आवश्यक आहे. विनाबोर्ड बसेसना या प्रत्येक बाबीसाठी दंड करण्यात यावा. पुढील बोर्ड नसणे किंवा मागील रुट बोर्ड नसणे किंवा बोर्डला लाईट व्यवस्था नसणे या तिन्ही बाबी महत्वाच्या असून तिन्हीपैकी फक्त एका बाबीची पूर्तता होत नसेल तरी १००० रु . दंड लावण्यात यावा, तसेच सदरचा दंड सकाळ व दुपार पाळीसाठी स्वतंत्र आकारण्यात यावा, असे आदेश डेपो व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.











