न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड, (दि. 26 ऑगस्ट 2025) :- महापालिकेने नुकतीच प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली असली तरी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद अपेक्षेइतका उत्साहवर्धक नाही. रचना जाहीर होऊन तीन दिवस उलटून गेले असताना केवळ दोनच हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक ८ आणि प्रभाग क्रमांक २१ या दोनच प्रभागांतून हरकती दाखल झाल्या. प्रभाग ८ मध्ये इंद्रायणी नगर सोबत संतनगर हे नाव जोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तर प्रभाग २१ साठी अनुसूचित जाती-जमाती व आदिवासी मतदारसंख्या पाहता हा प्रभाग मागासवर्गीय राखीव करण्यात यावा, अशी मागणी समोर आली आहे.
नागरिकांना आपले मत व्यक्त करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर संपूर्ण शहराचे नकाशे अपलोड करण्यात आले असून, अनेक नागरिक ते पाहण्यासाठी प्रत्यक्ष महापालिकेतही येत आहेत.
दरम्यान, स्थानिक इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने प्रचारयंत्रणा सुरू केली आहे. सोशल मीडियावर मेसेजवहन, गौरी-गणपती सजावट स्पर्धा अशा उपक्रमांद्वारे मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
“सध्याची प्रभाग रचना ही फक्त प्रारूप असून नागरिकांचा अभिप्राय लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे”,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले.













