न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २६ ऑगस्ट २०२५) :- चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजतर्फे इयत्ता अकरावीतील नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे विभागीय शिक्षण संचालक गणपत मोरे, व्याख्याते व शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख आणि संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी व्यासपीठावर डॉ. भूपाली शहा, डॉ. तेजल शहा, डिंपल कुमार शहा, डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. पौर्णिमा कदम, प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, प्रा. वैशाली देशपांडे, प्रा. जस्मिन फरास, डॉ. सुनीता पटनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचा सत्कार डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या प्रसंगी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच सायबर वॉरियर्स पथकाने “सायबर सुरक्षा” विषयावरील पथनाट्य सादर करून जनजागृती केली व शपथ दिली.
मुख्य व्याख्याते इंद्रजीत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “तुमचा दोन वर्षांचा कालावधी उमेदीचा व पराक्रमाचा आहे. मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा. हिंसेपासून दूर राहा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला घडण्याची व बिघडण्याची दोन वाटा असतात. कोणती वाट निवडतो यावर तुमचे भविष्य ठरणार आहे. दिल, दोस्ती, दुनियादारीच्या भानगडीत पडू नका. आई-वडिलांच्या कष्टांचा सन्मान करा आणि त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून यशस्वी होण्याची शपथ घ्या.”
पुढे ते म्हणाले, “मला असामान्य व्हायचंय अशी तयारी आतापासूनच करा. वेळ अमूल्य आहे, त्याचा अपव्यय केल्यास भविष्यकाळ अंधारमय होईल. ध्येय ठरवा आणि सतत यशाच्या दिशेने प्रयत्न करा. तुम्ही पराक्रमी झालात तर जग आदराने तुमच्याकडे पाहील; तीच आई-वडिलांना दिलेली खरी अनमोल भेट ठरेल.”
शिक्षण संचालक गणपत मोरे यांनी पालकांना उद्देशून सांसांगिते “विद्यार्थ्यांची गुणवत्ता केवळ संख्यात्मक नसून गुणात्मक असावी. अनेक पालक मुलांच्या क्षमता व कौशल्यांचा विचार न करता त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादतात. त्यामुळे अपेक्षित यश मिळाले नाही तर विद्यार्थी चुकीच्या मार्गावर जातात. मुलांना जबाबदार नागरिक घडवायचे असेल तर त्यांना भाषा आणि इतिहासाची जाण असणे अत्यंत गरजेचे आहे.”
अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, “प्रत्येक मुलामध्ये जिद्द आहे. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे. वेळेचे नियोजन, सातत्य आणि कष्ट यांच्या जोरावर यश मिळते. अडचणी आल्या तर आई-वडिलांशी संवाद साधा. कमला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सामूहिक प्रयत्न सातत्याने केले जात आहेत.”
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी महाविद्यालयाच्या १२ वर्षांच्या प्रवासाचा आढावा मांडला.
सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे आणि प्रा. वर्षा निगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अर्चना गांगड यांनी मानले.













