न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २६ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. यावेळी त्यांनी शहरातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत विविध विषयांना मान्यता दिली.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विभागप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत पीएमपीएमएल पासेसच्या रकमेची भरपाई, ड गटातील वाहन दुरुस्तीकरिता निविदा मुदतवाढ, प्रभाग क्रमांक ८ मधील कार्यक्रमांसाठी मंडपव्यवस्था, प्रभाग १५ मधील जलवाहिन्या दुरुस्ती व डांबरीकरण, दत्तनगर दिघी येथील सभामंडप बांधणी, स्वच्छतागृह दुरुस्तीकरिता जेटिंग मशीन खरेदी आदी प्रस्तावांना मान्यता मिळाली.
तसेच धुरीकरणासाठी वाहनभाडे मुदतवाढ, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अमोनियम बायकार्बोनेट खरेदी, शासनाकडून मिळणारी रिसायकल वाहने कार्यरत करणे, विविध उद्यानांची देखभाल आणि कर्मचाऱ्यांसाठी अवकारिका चित्रपट प्रेक्षणाचा खर्च मंजूर करण्यात आला.
या निर्णयांमुळे शहरातील विकासकामे, स्वच्छता उपक्रम व सार्वजनिक सुविधा अधिक वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.













